
हे उपनिषदातील एक महावाक्य आहे.
एका ऋषीने हा अनुभव घेतला आणि त्याने तो शब्दात मांडला, मी ब्रम्ह आहे, म्हणजे मी शरीर मन नाही.
आता या वाक्याचा जप करून उपयोग नाही, कारण जप करतो म्हणजे मी विचार करतो आणि विचार करत असतो त्यावेळी मी मन असतो.अहं ब्रह्मास्मी म्हणजे मी साक्षी आहे हे भान ठेवायचे आहे.
साक्षी हा आकाशासारखा आहे.
आकाशात ढग येतात, काही वेळा सुंदर इंद्रधनुष्य दिसते.
पण ढग किंवा इंद्रधनुष्य दोन्ही अनित्य आहे, बदलणारे आहे, कायम राहत नाही.
मन हे असेच आहे. काहीवेळा ते आनंदी, निवांत असेल. काहीवेळा त्यामध्ये चिंतेचे, उदासीचे काळे ढग असतील.
आकाश सतत निरभ्र राहणार नाही. त्यामध्ये ढग येणार.
एखादा ढग एकटाच असेल, म्हणजे मनात येणारा एखादा त्रासदायक विचार.
काहीवेळा सर्व आकाश ढगांनी भरलेले असेल, म्हणजे मनाची अस्वस्थतेमुळे येणारी बेभान अवस्था.
पण हि स्थिती देखील बदलते. आणि आकाश सतत अलिप्त असते. त्याला ढग चिकटत नाहीत.
अहं ब्रह्मास्मी म्हणजे मी आकाश आहे, ढग नाही. मी साक्षी आहे, शरीर मन नाही. हा अनुभव ही त्या ऋषीची मक्तेदारी नाही. आपण सर्व माणसे हा अनुभव काही वेळ तरी घेऊ शकतो.
मात्र त्यासाठी काही वेळ तरी कर्ता आणि भोक्ता भाव बाजूला ठेवायला हवा.
आत्ता हे लिहित असताना मी कर्ता आहे. हे लिहून झाले की किमान काही मिनिटे शांत बसून श्वासाच्या हालचाली कडे लक्ष ठेवले आणि मनात आपोआप येणाऱ्या विचारांपासून अलग होत राहिलो, त्या विचारात वाहत गेलो नाही, विचार येतात तसेच विचार करत राहिलो नाही, पण त्या विचारांमुळे शरीरात होणारे बदल देखील जाणत आणि स्वीकारत राहिलो तर तेवढा वेळ मी शरीर आणि मन नाही.
मी साक्षी आहे ( Observing Self ) आहे.
दर तासात दोन मिनिटे, पाच मिनिटे असा सराव करणे हे
अहं ब्रह्मास्मी चा अनुभव घेणे आहे.
हा अनुभव घ्यायचा म्हणजे मला निवांत वाटलेच पाहिजे, मनात उदासी येताच नये अशी आसक्ती आणि द्वेष ठेवायचा नाही.
माझे शरीर सतत निरोगी, सशक्त राहिलेच पाहिजे अशीही आसक्ती ठेवायची नाही.
याचा अर्थ शरीर आणि मन यासाठी काही करायचेच नाही असे नाही. कर्ता होऊन शरीरासाठी आवश्यक तो व्यायाम करायला हवा, योग्य आहार घ्यायला हवा.
मनासाठी काही वेळ मनोरंजन करायला हवे, माहिती घ्यायला हवी, बुद्धीचा वापर करायला हवा, मुद्दाम विचार करायला हवा, भविष्याची दिशा ठरवायला हवी. मनात आशा कृतज्ञता करूणा मैत्री आनंद व क्षमा अशा भावना मुद्दाम निर्माण करून काही वेळ धरून ठेवायला हव्यात.
जशी मी माझ्या स्मार्ट फोन, माझ्या गाडीची, घराची काळजी घेतो तशी शरीराची आणि मनाची काळजी घ्यायला हवी.
पण मी स्मार्ट फोन, गाडी, घर नाही, तसेच मी शरीर आणि मन नाही याचे भान काहीवेळ तरी ठेवायला हवे.
असे भान ठेवणे याला इंग्लिश मध्ये Mindfulness Meditation म्हणतात.
दर तासात, रोज असा काही वेळ जरी त्यासाठी दिला तर अहं ब्रह्मास्मी हे केवळ शब्द रहात नाहीत.
Dr. Yash Velankar
Sattvavajay Therapist in Mumbai
Ayurvedacharya. Masters in Psychotherapy and counselling
Masters in Philosophy
Co-ordinator of Sattvavajay Movement
Call Now Write us