
मी मेंदूचा गुलाम नसून स्वामी आहे, ‘मी’ मनातील भावना बदलल्या की मेंदूतील रसायने बदलू शकतात. या ठिकाणी ‘मी’ म्हणजे कोण असा प्रश्न निर्माण होतो. तत्वज्ञानाची चर्चा न करता या ‘मी’ ला साक्षीभाव, ओब्सर्विंग सेल्फ म्हटले जाते. ध्यानावर आधारित परदेशात वापरले जाणारे मानसोपचार आणि आयुर्वेदातील सत्त्वावजय चिकित्सा यांचे ध्येय हा साक्षीभाव विकसित करणे हेच असते.
आधुनिक मानसोपचार पद्धतींमध्ये ओब्सर्विंग सेल्फ हा शब्द एकविसाव्या शतकात वापरला जाऊ लागला असला तरी या संकल्पनेचा उपयोग पूर्वी पासून होत आहे. सामान्यतः मी हा शब्द शरीर आणि मन यासाठी वापरला जातो. मी उंच आहे असे माणूस म्हणतो त्यावेळी तो शरीराला मी म्हणत असतो.
मी उदास आहे असे म्हणतो त्यावेळी मनाला मी म्हणत असतो. मी मध्ये शरीर आणि मन यांचा सहभाग होत असला तरी मी म्हणजे केवळ शरीर मन नाही. मी सहा वर्षांची असताना नागपूर मध्ये राहायचे असे चाळीशीची स्त्री सांगते त्यावेळी तिचे लहानपणी होते ते शरीर बदललेले असते. लहान असताना जे महत्वाचे वाटते ते आता वाटत नाही म्हणजे मन देखील बदलले असते पण मी तीच आहे आहे हा भाव कायम असतो. या भावालाच साक्षीभाव म्हणतात. मी माझ्यातील कौशल्ये आणि मर्यादा पाहतो त्यावेळी साक्षी असतो. साक्षीभाव नसेल तर आत्मभान शक्य नसते.
म्हणजेच साक्षीभाव हा शब्द आध्यात्मिक वाटत असला तरी त्यामध्ये कोणतेही गूढ नाही. ती शुद्ध मानसशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणूनच मानसोपचारात तिचा उपयोग करून घेतला जातो. हा भाव विकसित झाला की उदासी असताना मी उदास आहे असे न म्हणता माझे मन उदास आहे अशी स्वतःशी नोंद करता येते. मग उदासी प्रयत्नपूर्वक बदलता येते किंवा ती किती वेळ राहते ते पाहूया असे म्हणून तिचा वर्तनावर होणारा परिणाम टाळता येतो. पण हे शक्य होण्यासाठी उदासी नसताना मनातील विचार आणि भावना त्यांना प्रतिक्रिया न करता पाहण्याचा सराव आवश्यक असतो.रोज स्मरण होईल त्या वेळी असा सराव केला की साक्षीभाव विकसित होतो.तो विकसित झाल्याशिवाय मेंदूचे स्वामी होता येत नाही.
No Comments
No comments yet.
RSS feed for comments on this post. TrackBack URI
Leave a comment