Vist us on
रोगांचे कारण

Blog

रोगांचे कारण

March 17th, 2020 by  / Total comments: 7

माणूस भावनेच्या आवेगात चुकीची कृती करतो त्याला सत्त्वावजय चिकित्सेत प्रज्ञापराध म्हणतात. साऱ्या शारीरिक आणि मानसिक आजारांचे ते एक कारण आहे. याचे तीन घटक आहेत. पहिला घटक म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य हे बुध्दीला कळलेले नसते.

विचारांचा आणि भावनांचा परिणाम शरीर मनावर कसा होतो, तणावाचे दुष्परिणाम कोणते आहेत, ते कसे कमी करता येतात याची माहिती नसते. मनातील भावनांचा आवेग कसा टाळायचा, विवेक बुध्दी कशी विकसित होते, सुप्तमन कसा प्रभाव गाजवते हे माहित नसते.

मनोवेध मधून मनाचे स्वरूप आणि मानसोपचार याविषयीची माहिती घेऊन हे कारण आपण दूर करीत आहोत. माहितीचे ज्ञानात रुपांतर करण्यासाठी त्यावर विचार करायला हवा. शंका विचारायला हव्यात आणि या विषयाचे ज्ञान वाढवायला हवे.

प्रज्ञापराधाचा दुसरा घटक म्हणजे ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग न करणे होय. योग्य काय, अयोग्य काय हे बुध्दीला समजलेले असते, पटलेले असते पण ते कृतीत येत नाही. कारण कृती होण्यासाठी आपल्या अनेक सवयी बदलाव्या लागतात. स्वयंशिस्त वाढवावी लागते, स्वतःचे नियमन, नियंत्रण करावे लागते.

हे करणाऱ्या शक्तीला धृतिः म्हणतात. धृतिः म्हणजे नियमन शक्ती होय. ही वाढवण्याचा एक मार्ग योगशास्त्र आहे. पातंजल योगसूत्राचे पहिले सूत्र ‘अथ योगानुशासनम’ असे आहे.योग हे स्वयं अनुशासन आहे. माणसाच्या मेंदूतील प्रीफ्रन्टल कोर्टेक्सचे हे कार्य आहे. याला न्युरोसायंस मध्ये सेल्फ रेग्युलेशन म्हणतात. मानवी मेंदूची जी व्यवस्थापकीय कार्ये आहेत त्यातील हे महत्वाचे कार्य आहे.

सर्व रोगांचे कारण असलेला प्रज्ञापराध टाळायचा असेल तर धृतिः बळकट करायला हवी. संकल्प करून त्यानुसार वागायला हवे. ते शक्य झाले की स्वतःलाच शाबासकी घ्यायला हवी. प्रज्ञापराधाचा तिसरा घटक साक्षीभावाचा सराव न करणे हा आहे. त्याला स्मृतिभ्रंश म्हणतात. चरक संहितेत ‘तत त्व’ चा म्हणजे ‘मी साक्षी’ हा विसर म्हणजे स्मृतिभ्रंश असे स्पष्ट सांगितले आहे. मी साक्षी याचे स्मरण म्हणजे स्मृति, सजगता स्थापित करणे होय.

माइन्डफुलनेस हा इंग्रजी शब्द स्मृति,सति याच अर्थाने वापरला जाऊ लागला. त्याचा सराव करायचा म्हणजे आपले लक्ष कुठे आहे याकडे लक्ष द्यायचे. बुध्दी,धृतिः आणि स्मृति बळकट करणे ही सत्त्वावजय चिकित्सा आहे. ती आजार बरे करण्यासाठी आहे तशीच ओज आणि तेज वाढवण्यासाठी आहे.

No Comments

No comments yet.

RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a comment

Recent Posts

Categories

Archive