
मेंदूतील सेरेटोनीन हे रसायन वाढवणारी औषधे डिप्रेशनमध्ये वापरली जातात. सेरेटोनीन आतड्यातील न्युरोंस मध्ये तयार होते. त्यामुळे पचन संस्था आणि उदासी याचा निकटचा संबंध आहे.त्याचप्रमाणे प्रकाशाशी देखील त्याचे नाते आहे. अंधुक प्रकाशात ते तयार होत नाही.त्यामुळे ढगाळ हवामान असेल तर आपल्याला उदास वाटते. युरोप आणि अमेरिकेत हिवाळ्यात सूर्यदर्शन होत नाही त्यवेळी औदासिन्य वाढते त्याला विंटर ब्ल्यू म्हणतात.
विज्ञानात पूर्वी असे मानले जायचे की माणसाचे मन हे त्याच्या मेंदूतील रसायनांचा परिणाम आहे. ही रसायने कमी जास्त होतात त्यानुसार मनातील भावना बदलतात. सेरेटोनीन नावाचे रसायन कमी झाले की नैराश्य येते. हे नैराश्य अधिक काळ टिकले, त्यामुळे माणसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला की त्याला क्लिनिकल डिप्रेशन, औदासिन्य हा आजार आहे असे म्हटले जाते. सेरेटोनीन कमी होणे हे कारण आहे आणि नैराश्य हा परिणाम आहे, या सिद्धांतावरच औदासीन्याचे औषधे तयार करणाऱ्या कंपन्या श्रीमंत झालेल्या आहेत.
मात्र ध्यानावरील संशोधनाने या सिद्धांतालाच आव्हान दिले आहे. आपण मनात संतोष, कृतज्ञता,प्रेम अशा भावना निर्माण करतो त्यावेळी मेंदूतील रसायने बदलतात, सेरेटोनिनची पातळी वाढते असे प्राथमिक संशोधनात आढळले आहे. म्हणजेच या संशोधनानुसार मनातील भावना हा मेंदूतील रसायनांचा केवळ परिणामच आहे असे नसून भावना हे कारण आणि रसायने हा परिणाम असा बरोबर विरुद्ध सिद्धांतदेखील खरा आहे.
मला उदास वाटत असेल त्यावेळी माझ्या मेंदूत सेरेटोनीन कमी झालेले असणार. पण मी जाणीवपूर्वक मनातील भावना बदलल्या, मनात उत्साह, आनंद निर्माण केला, दोन उडया मारल्या, एक शीळ घातली आणि त्या क्षणाचा समरसून आनंद अनुभवू लागलो तर त्याचा परिणाम म्हणून कोणतेही औषध न घेतादेखील माझ्या मेंदूतील रसायने बदलतात. उत्साहाने शारीरिक हालचाली केल्या की सेरेटोनीन वाढते.
या संशोधनाने हे सिध्द झाले आहे की मी माझ्या मेंदूच्या हातातील बाहुले नाही, तर माझ्या मेंदूचा शिल्पकार आहे. मेंदूतील रसायने बदलल्याने माझ्या मनातील भावना बदलतात हे जसे खरे आहे,तसेच मी माझ्या भावना बदलल्या तर मेंदूतील रसायने बदलतात. सत्त्वावजय चिकित्सेत याच सिद्धांताचा उपयोग करून घेतला जातो. त्यासाठी कल्पनादर्शन आणि करुणा ध्यान यांचा उपयोग करून घेतला जातो. मात्र भावनावेगात वाहून जाणे टाळायचे असेल तर प्रथम साक्षी ध्यानाचा देखील सराव करावा लागतो.
No Comments
No comments yet.
RSS feed for comments on this post. TrackBack URI
Leave a comment