सत्त्वावजय चिकित्सेत तत्वज्ञानातील कोणत्याहीएका मताला महत्व दिले जात नाही. कारण तत्वज्ञान हा देखील एक विचार आहे. मनातील विचार म्हणजेच अंतिम सत्य नाही हे भान वाढवणे हा साक्षी ध्यानाच्या सरावाचा उद्देश आहे. त्यामुळे विचारांची लवचिकता वाढते. अन्यथा माझेच तत्वज्ञान खरे हा हट्ट दृढ होतो. माणूस कोणत्याही विचारात असतो, मग ते विचार कामवासनेचे असोत किंवा तत्त्वज्ञानाचे असोत, त्यावेळी मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क काम करीत राहते. त्याला विश्रांती द्यायची असेल तर विचारातून बाहेर पडून लक्ष वर्तमान क्षणात आणायला हवे.
सराव न करता ध्यानाचाही केवळ विचार,चर्चा करीत राहिलो तर मेंदूला विश्रांती मिळत नाही. त्याला विश्रांती देण्यासाठी आणि भावनिक बुध्दी वाढवण्यासाठी लक्ष आवाजांवर किंवा शरीरावर आणायला हवे. आवाज ऐकला की लगेच तो कसला आवाज आहे याचा विचार येतो. शरीरात काही संवेदना जाणवल्या तर त्याचेही विचार येतात.असे विचार येणे स्वाभाविक आहे. ते मेंदूचे एक काम आहे. असा विचार म्हणजे त्या अनुभवाचा मेंदू अर्थ लावत असतो.
मात्र हा अर्थ प्रत्येकवेळी बरोबरच असतो असे नाही. एखादा आवाज ऐकू आला की तो या माणसाचा आहे असा अर्थ मेंदू लावतो मात्र काहीवेळा हा अंदाज चुकीचा असू शकतो. त्याचसाठी ध्यानाचा सराव करताना मनात येणाऱ्या कोणत्याच विचाराला महत्व द्यायचे नाही. कोणताही विचार ही एक शक्यता आहे, तेच पूर्णसत्य नाही.
जैन तत्वज्ञानात याला स्यादवाद म्हणतात. त्याचा अर्थ ‘असेही असू शकेल’ असा आहे.मात्र पुन्हा ‘हेच तत्वज्ञान योग्य’ अशा विचारात न राहता विचारांचा उगम कसा होतो हा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला हवा. केवळ माहितीमध्ये न रमता ध्यानाचा सराव करायला हवा. असा सराव केला की ‘स्व’ विषयी मनात येणाऱ्या विचारांना किती महत्व द्यायचे याचाहि विवेक विकसित होतो.
‘मी’ हा देखील एक विचार आहे. या ‘मी’ विषयी जे विचार मनात येतात ते खरे आहेत असे वाटल्यानेच उदासी किंवा अहंकार वाढतो. पण मी कुरूप आहे किंवा सुंदर आहे हा विचार ही एक मानसिक घटना आहे, तेच अंतिम सत्य नाही याची जाणीव ध्यानाच्या नियमित सरावाने वाढते. याचसाठी सत्त्वावजय चिकित्सेत समुपदेशन आणि ध्यान या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात.
No Comments
No comments yet.
RSS feed for comments on this post. TrackBack URI
Leave a comment