Vist us on
अंतःकरण

Blog

अंतःकरण

March 3rd, 2020 by  / Total comments: 4

योग, आयुर्वेद यामध्ये माणसाच्या अंतरविश्वाला अंतःकरण असे नाव दिलेले आहे. त्याचे मन, बुद्धि, अहंकार आणि चित्त असे चार भाग आहेत. माणसाला बाह्य जगाचे ज्ञान ज्ञानेंद्रिये करून देत असली तरी तेथे मन नसेल तर ते ज्ञान होत नाही. इंग्रजीत अटेन्शन या शब्दाने जे सांगितले जाते ते मनाचे एक कार्य आहे. मन विचारात असले तर शरीराला होणाऱ्या स्पर्शाचे ज्ञान होत नाही. ते तळपायावर नेले की तेथे स्पर्श जाणवू लागतो.

जे काही जाणवते आहे त्याचा अर्थ लावणे हे बुद्धीचे कार्य आहे. कानावर आवाज पडल्या नंतर हा आवाज या गाडीचा किंवा या पक्षाचा आहे हे ओळखते ती बुद्धि, प्रत्येक इंद्रियाची वेगळी बुद्धि आहे असे चरकाचार्य यांनी सांगितले आहे.

मन आणि बुद्धि यांचा एकत्रित परिणाम म्हणून विचार निर्माण होतात. आवाज ऐकू आल्यानंतर हा या माणसाचा आवाज आहे हे आपण ओळखतो म्हणजे तो विचार येतो.असे असंख्य विचार येत असतात, काहीवेळा ते परस्परविरोधी देखील असतात. त्यामुळे मनाचे संकल्प विकल्पात्मक मन असेही वर्णन केलेले आहे. करावे की करू नये अशा संभ्रमात पडणे ही केवळ अर्जुनाची किंवा हॅम्लेटची अवस्था असते असे नाही. प्रत्येक माणसाच्या मनाचे ते स्वाभाविक लक्षण आहे. आत्ता हे विचार आहेत हे माणसाचे मन जाणू शकते म्हणून ते ज्ञानेंद्रिय आहे आणि ते कर्म करते म्हणून त्याला उभयात्मक इंद्रिय म्हटले आहे. परस्परविरोधी विचारातील कोणता विचार कृतीत आणायचा हे जी बुद्धि ठरवते तिला विवेक बुद्धि म्हणतात. असा निर्णय घेणे हे बुद्धीचे कार्य आहे, त्यामुळे निश्चयात्मक बुद्धि असे तिचे वर्णन केले आहे.

अंतःकरणाचे तिसरे अंग म्हणजे अहंकार होय. मन आणि बुद्धि प्रमाणेच अहंकार असणे स्वाभाविक आहे. मी म्हणजे इंग्रजीत सेल्फ हा अर्थ यामध्ये अभिप्रेत आहे. अहं करोति इति अहंकार, मी हे खातो, मला हे आवडते, हे जमते, हे करता येत नाही हा भाव म्हणजे अहंकार होय.हा अहंकार म्हणजे स्मृतींचे गाठोडे असते.

चित्त म्हणजे स्मृतीचे गाठोडे बाजूला ठेवून घेतलेला अनुभव होय. सत्त्वावजय चिकित्सेत साक्षीध्यानाच्या सरावाने अंतःकरणातील या चारही भागांचे कार्य जाणता येते. उदासी मनात असते, त्या वेळी आत्ता माझे मन उदास आहे अशी नोंद करून उदासीमुळे निष्क्रिय न होता सक्रीय राहता येते. म्हणजेच साक्षी भाव उदासीला जाणतो पण त्याचा परिणाम अहंकाराच्या कृतीवर होऊ देत नाही. उदासी ही सर्जनशीलतेची जननी असू शकते. आत्ता मी जे काही करीत आहे त्याची दिशा बदलणे गरजेचे आहे हा संदेश उदासी देत असते. बुध्दीने हे जाणले की ती अन्य पर्याय शोधू शकते. मात्र अंतःकरणातील हे चारही भाग अनुभवायचे असतील तर साक्षीभावाने अंतर्विश्वात डोकावायला हवे.

1 Comment

  • By Sarang Apte, March 3, 2020 @ 7:35 am

    सर खूप छान माहिती. या माहितीचा आम्हाला आमच्या पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी निश्चितच उपयोग होईल.

Other Links to this Post

RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a comment

Recent Posts

Categories

Archive